श्रीकिशन सोमाणी आंतरशालेय व्हॉलिबॉल चषक स्पर्धा


अभिनव मानव विकास संस्थाद्वारा संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त विद्यालयात दि. ४ फेब्रुवारी २०१७ रोजी "श्रीकिशन सोमाणी आंतरशालेय व्हॉलिबॉल स्पर्धे" चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील एकूण ९ विद्यालयातील ८ विद्यार्थी व ५ विद्यार्थिनींच्या संघानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मा. मोईज शेख यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा, सचिव कमलकिशोर अग्रवाल, शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. एम.एस. कुलकर्णी, रौप्यमहोत्सव समितीचे संयोजक अतुल देऊळगांवकर, संस्थेचे कोषाध्यक्ष जयेश बजाज, सहसचिव सुभाष कासले, डॉ. रमेश जाजू, राष्ट्रपती पदक विजेते खेळाडू तथा पोलीस निरीक्षक रहेमान सय्यद, लक्ष्मीकांत सोमाणी, मुख्याध्यापक सुभाष मिश्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या उद्घाटनपर भाषणात मा. मोईज शेख यांनी "क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातूनही विद्यार्थी आपले उज्वल भवितव्य घडवू शकतात" असे प्रतिपादन केले.

व्हॉलिबॉल स्पर्धेच्या प्रारंभी श्रीकिशन सोमाणी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. सहभागी विद्यार्थी संघांनी संचालानाद्वारे श्रीकिशन सोमाणी यांच्या प्रतिमेस व उपस्थित पाहुण्यास मानवंदना दिली. मोईज शेख यांनी सर्व सहभागी स्पर्धकांना क्रीडाशपथ दिली. दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेचे सय्यद मुजीब, दीपक कांबळे , शौकत पठाण , शाहिद शेख, मोसीन शेख, रियाज शेख, रहेमान सय्यद आदी पंचांनी स्पर्धेचे उत्तम संयोजन व नियमन करून स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडल्या. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर सायंकाळी ४ वा. पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष एड. आशिष बाजपाई यांच्या हस्ते संपन्न झाला. या स्पर्धेत मुलांच्या संघात प्रथम क्रमांक स्वामी विवेकानंद विद्यालयाने पटकावला. द्वितीय हजरत सुरत शहावली उर्दू शाळा, तृतीय महाराष्ट्र विद्यालय. मुलींच्या संघात प्रथम यशवंत विद्यालय, द्वितीय राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कुल, तर तृतीय क्रमांक महाराष्ट्र विद्यालयाच्या संघाने पटकावला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव कमलकिशोर अग्रवाल यांनी केले. प्रास्तविकात त्यांनी या स्पर्धेच्या आयोजनामागची पार्श्वभूमी सविस्तरपणे विशद केली. दिवंगत श्रीकिशन सोमाणी तत्कालीन राज्यपातळीवरील व्हॉलिबॉल खेळाडू होते. राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी जात असताना त्यांना दुर्दैवाने कार अपघातात आपले प्राण गमवावे लागले होते. त्यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या या विद्यालयाच्या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून ही आंतरशालेय स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉलिबॉल स्पर्धेच्या उद्घाटनसमारंभाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. नंदिनी तांबाळकर यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संस्थापदाधिकारी, प्रशालाप्रमुख सुभाष मिश्रा, उपमुख्याध्यापक राजेंद्र लातूरकर, पर्यवेक्षकत्रय विजया कुलकर्णी,गिरीश कुलकर्णी व संजय क्षीरसागर, क्रीडा शिक्षक शिवानंद मठपती, शाळासंपर्क प्रमुख राहुल पांचाळ, महादेव गुंजकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.